लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शंभर टक्के मतदान शांततेत होवून रात्री मतपेट्या पोलीस बंदोबस्तात नवी मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातून दोन उमेदवार रिंगणात होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून दोन संचालक नेमण्याची तरतूद असून, नाशिक विभागातून दोन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यात नाशिक जिल्ह्यातून जयदत्त होळकर, अद्वय हिरे हे दोघे तर नगर, धुळे, जळगाव, नंदुबार या जिल्ह्यातून प्रभाकर पवार, सुनील पवार, किशोर भिकन पाटील, किशोर देवीदास पाटील, रितेश पाटील, श्रीहर्ष शेवाळे यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सतरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार असून, जिल्ह्यात २३८ मतदार आहेत. प्रत्येकी दोन मते देण्याचा अधिकार असल्याने व नाशिक जिल्ह्यातच सर्वाधिक मतदार असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी नाशिकवर लक्ष केंद्रीत केले होते. शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदानाला सुरूवात करण्यात आली. मतदार संख्या मर्यादित असली तरी, या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व विरोधक अशी लढत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी मतदान स्थळावर झाडून हजेरी लावली होती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंगळे गटाचे चौदा सदस्यांनी एकाच वेळी मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजावला तर एक महिला मतदार आजारी असल्याने रूग्णालयात दाखल असल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारांच्या समर्थकांनी त्या अवस्थेतही त्यांना मतदान केंद्रावर आणून मतदानाचा हक्क बजावण्यास भाग पाडले. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपुष्टात आली. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारांनी शंभर टक्के हक्क बजावल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतपेटी मुंबईकडे रवाना करण्यात आली. सोमवारी नवी मुंबईत मतमोजणी करण्यात येणार आहे.