नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तु ढोकणे या शेतक-याने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा वर्षातील हा उच्चांक मानला जात असून, आगामी निवडणुकीत हा राजकीय मुद्दा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यशवंत दत्तु ढोकणे (६५) यांच्या नावावर बारा ते तेरा हेक्टर क्षेत्र शेवगे दारणा व पळसे येथे असून, त्यांच्या नावे आयडीबीआय बॅँकेत सात ते आठ लाख रूपये कर्ज आहे तसेच सोसायटीचेही तीन लाख रूपये कर्ज आहे. ते स्वत: बीएसएनएलमधून सेवा निवृत्त झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ढोकणे यांनी घराच्या मागच्या पडीक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आला. ढोकणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सुन, तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून, कर्जबाजारीपणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, दर महिन्याला सरासरी आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत.विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतक-यांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे. शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथील प्रल्हाद नथु अहिरे (६०) यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणा-या शेतक-यांची संख्या शंभर झाली होती, त्यात शनिवारी यशवंत ढोकणे यांच्या आत्महत्येने भर पडली आहे. नाशिक तालुका त्या मानाने सधन मानला जात असतानाही शेतक-याने आत्महत्या केल्याने एकट्या तालुक्यात चार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.राज्यात सन २००२ पासून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, तेव्हापासून त्यात सातत्याने वाढच होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेर ८७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र समाधानकारक पाऊस व शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने हा विषय आगामी निवडणुकांमध्ये राजकीय मुद्दा होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात १०१ शेतक-यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:43 PM
विशेष म्हणजे यंदा व गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस होऊन खरीप, रब्बी पिकाने शेतक-यांना हात दिला. परंतु नोटबंदी व शेतमालाचे घसरलेले दर पाहता, शेतकरी दोन्ही वर्षी प्रचंड अडचणीत सापडला. त्यातूनच कर्जबाजारीपणात भर पडली आहे.
ठळक मुद्देआकडा शंभरी पार : पंधरा वर्षातील उच्चांकशुक्रवारी मध्यरात्री ढोकणे यांनी घराच्या मागच्या पडीक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.