नाशिक : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात लावलेली दमदार हजेरी व त्यानंतरही अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्केपाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला असून, भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणाºया पाण्याला ब्रेक लावला आहे. आॅगस्ट महिन्यात जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची कार्यवाही केली. परिणामी गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. असाच प्रकार दारणा धरणाच्याबाबत घडल्यामुळे तेथूनही मोठा विसर्ग करण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी २२ टीएमसी पाणी पोहोचले. परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही जेमतेम साठा असल्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शेवटच्या आठवड्यात पावसाचे धुवाधार पुनरागमन झाल्याने गंगापूर धरण पाणलोट क्षेत्राचा लाभ धरण समूहाला झाला. अजूनही त्र्यंबकेश्वर, आंबोली या भागात पावसाची कमी अधिक हजेरी असल्यामुळे गंगापूर धरण १०१ टक्के भरले तर या धरण समूहातील कश्यपी ९९, गौतमी गोदावरी ९८ व आळंदी धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गंगापूर धरणात ९४ टक्के, तर समूहात ९६ टक्केजलसाठा होता.जिल्ह्यातील धरणे झाली फुल्लजिल्ह्यातील आठ धरणे शंभर टक्केफुल्ल झाली असून, जवळपास सर्व धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा झाला आहे. शंभर टक्केभरलेल्या धरणांमध्ये गंगापूर, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझरचा समावेश आहे. त्यातील गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, चणकापूर या धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८५ टक्के भरली होती.
गंगापूर धरणात १०१ टक्केसाठा : पाणीप्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:01 AM