कळवण : शहरात सुरू असलेल्या विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला उत्सवात प्रारंभ झाला असून, तालुक्यातील हजारो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन यात्रेचा मनमुराद आनंद लुटला. यात्रेला कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व ग्रामस्थांनी हजेरी लावल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. यात्रा काळात विविध मनोरंजनाच्या साधनांमुळे यंदाच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दरम्यान लाखो रुपयांची उलाढाल झाली.यात्रोत्सवानिमित्त कै. राजाराम पगार कुस्ती मैदानावर पहिल्याच दिवशी लहान-मोठ्या अशा १०१ कुस्त्या झाल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पगार व खजिनदार रवींद्र पगार यांनी दिली. विठोबा महाराज यात्रा महोत्सव, मंदिर देवस्थान ट्रस्ट, कळवण नगरपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती दंगलीचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर, मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार कमकोचे अध्यक्ष गजानन सोनजे, माजी सरपंच परशुराम पगार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अशोक जाधव, डॉ. दौलतराव अहेर पतसंस्थेचे संस्थापक नंदकुमार खैरनार, कमकोचे संचालक सुनील महाजन, उद्योजक अजय मालपुरे आदि मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवसाच्या कुस्ती दंगलीत प्रेक्षणीय कुस्तीचे दर्शन कळवणकरांना घडले. येवला, मनमाड, भगूर, नाशिक, पुणे, कोपरगाव, सातारा, सांगली, मुंबई, दिल्ली आदि ठिकाणच्या कुस्तिगिरांनी हजेरी लावली. १०१ पासून ५००१ रुपयेपर्यंत रोख रकमेचे पारितोषिकांसह आकर्षक भेट वस्तू देऊन कुस्तीपटंूचा गौरव करण्यात आला. रविवारी (दि. २१) कळवण केसरी कुस्ती दंगलीस प्रमुख अतिथी म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, आनंद अॅग्रो ग्रुपचे संचालक उद्धव आहेर, शासकीय ठेकेदार रमेश शिरसाठ, कुस्तीगीर हिंदकेसरी सुनील साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत.पंच म्हणून सुधाकर पगार, भावराव पगार, हरिभाऊ पगार, निंबा पगार, कृष्णा पगार, मोतीराम पगार, राजेंद्र पगार, हरिश्चंद्र पगार, मोयोद्दीन शेख, साहेबराव पगार, सुरेश निकम आदि काम पाहत आहे. (वार्ताहर)
कुस्ती दंगलीत पहिल्या दिवशी १०१ कुस्त्या
By admin | Published: February 20, 2016 10:36 PM