नाशिक : आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील ८०, तर नाशिक ग्रामीणमधील २२ आणि मालेगाव मनपाच्या एका बळीचा समावेश आहे.
गुरुवारच्या एका दिवसात एकूण चार नागरिकांचे बळी गेले असून, त्यात तीन नाशिक ग्रामीणचे तर एक नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. कोरोना मृत्यूच्या नोंदी दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारपर्यंत बळींची संख्या अंतिमरीत्या अपडेट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत भरून काढण्यासाठी गुरुवारपासून पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या अपडेट बळींमुळे एकूण बळींची संख्या ७२३५वर पोहोचली आहे.
इन्फो
नवीन १५८, कोरोनामुक्त १६३
जिल्ह्यात गुरुवारी एकूण रुग्णसंख्येत १५८ने वाढ झाली, तर १६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन कोरोनाबाधितांमध्ये १२२ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, ३९ रुग्ण नाशिक मनपाचे, ०१ मालेगाव मनपाचा, तर १० जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. दरम्यान, पोर्टलवर सोमवारी एकूण १०३ बळी नोंदविले गेल्याने, एकूण बळींच्या संख्येत मोठी वाढ होऊन ही संख्या ७२३५ झाली आहे.
इन्फो
प्रलंबित पुन्हा अकराशेवर
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांच्या संख्येत गुरुवारी पुन्हा काहीशी भर पडून ती संख्या ११०६वर पोहाेचली आहे. त्यात ६४२ नाशिक ग्रामीणचे, ३१५ मालेगाव मनपाचे, १४९ नाशिक मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याच्या सरासरी टक्केवारी ९७.२७ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर उपचारार्थी रुग्णसंख्या ३४७७वर पोहोचली आहे.