नाशिक : ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी हिंदीतील एक म्हण आहे. डोके शाबूत राहिले तर कित्येकदा पगडी घालता येऊ शकते, असा या म्हणीचा अर्थ होतो अन् डोक्याचे महत्त्वही अधोरेखित होते; मात्र हेल्मेटचा कंटाळा करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. मागीलवर्षी शहरात दुचाकी अपघातात १०४ व्यक्तींचा बळी गेला. यापैकी केवळ १३ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर केल्याचे आढळून आले. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला; मात्र उर्वरित ९१ दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता आणि हे त्यांच्या जिवावर बेतले.
हेल्मेट हैं जरुरी, ना समजो इसे मजबुरी’ हे घोषवाक्य शहरात बहुतांश रिक्षांसह अन्य वाहनांवर तसेच भित्तीफलकांवर आणि सिग्नलवरील फलकांवर वाचावयास मिळते; मात्र याबाबत नाशिककरांमध्ये अद्यापही फारशी जागरुकता आल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत नाही. अनेक दुचाकीस्वार तर केवळ हेल्मेट दाखविण्यासाठी सोबत बाळगतात. हेल्मेट त्यांच्या डोक्यात नव्हे, तर आरशावर किंवा दुचाकीला पाठीमागे लटकविलेले असते. हेल्मेटसोबत असल्याचा हा देखावा जिवावरही बेतणारा ठरू शकतो. शहरात सध्या हेल्मेट वापराबाबत शहर वाहतूक पोलिसांकडून सक्ती केली जात नसली, तरीदेखील आपल्या जिवाची काळजी म्हणून दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर गरजेचाच असून, हादेखील एक रस्ता सुरक्षेचा एक भाग आहे, हे विसरुन चालणार नाही.
या नवीन वर्षात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ सालाबादप्रमाणे राबविले जात आहे. नाशिककरांनी दुचाकीने विनाहेल्मेट प्रवास करणारच नाही, असा संकल्प यानिमित्ताने करायला हरकत नाही. तरच २०२१अखेर दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा कमी होईल, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.
---इन्फो---
...म्हणून हेल्मेट गरजेचे
हेल्मेट परिधान करणे हे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. दुचाकींच्या अपघातात वाढ झाली असून, कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चपासून मे महिन्यांपर्यंत अपघातांचे प्रमाण कमी राहिले होते; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघात वाढले आहे. हेल्मेटचा वापर हा अत्यावश्यक आहे. कारण शरीराचा सर्वात महत्त्वाचा अन् तितकाच नाजूक अवयव अर्थात मेंदूच्या सुरक्षेसाठी ते एकप्रकारचे सुरक्षा कवचच आहे. हेल्मेटमुळे मेंदूसाठी असलेले नैसर्गिक कवचदेखील शाबूत राहण्यास मदत होते, असे मेंदूविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
---पॉइंटर्स--
* * * * * * * * * *सर्वात जास्त अपघात (७१%) अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याचे निष्पन्न.
*सर्वाधिक अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले (५०.०३%)
* सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत सर्वाधिक अपघात.
*डोक्याला जबर मार लागून जागीच तसेच उपचारादरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त.
-----
२१ हेल्मेट नावाने फोटो आर वर सेव्ह