महापालिकेेचे आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी शहरात कोरोनाचे महासंकट आल्यानंतर महापालिकेने भाजीपाला आणि फळ विक्रीसाठी १०४ ठिकाणी निश्चित केली होती. बंधने शिथिल झाल्यानंतर मात्र, आरोग्य नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. विशेषत: या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ससंर्ग वाढू लागला आहे. तसेच अनेक ठिकाणी हातगाडीवर भाजीपाला आणि फळे विकणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी हातगाडीभोवती किमान एक मीटर दूर राहण्याचे सुरक्षित अंतराचे पालन केले जात नसल्याचे आढळले आहे. महापालिकेने यापूर्वी भाजी आणि फळ विक्रेत्यांना सुरक्षित अंतराचे पालन करतानाच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केला, तसेच हँडग्लोज घालणेदेखील बंधनकारक केले होते. मात्र, त्याचे पालन तर झाले नाहीच उलट आता महिला वर्ग खरेदीसाठी आल्यानंतर त्यांच्या फळ आणि भाज्यांच्या हाताळणीतून देखील संसर्ग पसरू शकतो. त्यामुळेच आयुक्तांनी आता आरोग्य नियमाचे पालन करण्यासाठी नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ज्या १०४ भाजी आणि फळ मार्केटमध्ये आरोग्य नियमांचे पालन केले जात नाही, तसेच बंदीस्त असलेल्या ज्या भाजी आणि फळ बाजारात नागरिकांना जाण्या येण्यासाठी एकच मार्ग आहे, ती तत्काळ बंद करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत, तर दुसरीकडे महापालिकेची मैदाने, मोकळी जागा, सोसायटी व कॉलनीच्या मोकळ्या जागांमध्ये आरोग्य नियमांचे पालन करून भाजी आणि फळ विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. त्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांनी बंगले आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तीन दिवसांत नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
इन्फो...
विक्रेत्यांना नियमांचे पालन आवश्यक
नाशिक शहरात नव्या जागांवर भाजीपाला आणि फळे विक्री करणाऱ्यांना मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.