नाशिक : एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काेरोना लाटेवर रेमडेसिविरची मात्रा कामी येत नसल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील १०५ रूग्णालयांनी गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरची मागणीदेखील केलेली नाही. कोरोनानंतर उद्भवणाऱ्या आजारांमध्ये रेमडेसिविरचा वारेमाप वापरदेखील कारणीभूत असल्याचे त्याचबरोबर म्युकरमायसोसिससारख्या गंभीर आजाराचे वाढत असलेले प्रमाण पाहता, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत आता डॉक्टरांकडूनही काळजी घेतली जात असल्याने रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरली. रूग्णांची संख्या वाढल्याने रूग्णालये अपुरे पडू लागली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. अत्यवस्थ व गंभीर रूग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरची एकमेव मात्रा उपयोगी पडत असल्याचे पाहून सर्वच रूग्ण व रूग्णालयांसाठी रेमडेसिविरचा आग्रह धरला गेला. त्यामुळे रेमडेसिविरची मागणी वाढून काळाबाजारही सुरू झाला. एकेका इंजेक्शनसाठी रूग्णांचे नातेवाईक औषधाच्या दुकानांबाहेर चौदा ते सोळा तास रांगेत ताटकळले.
nनाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसात दररोज रेमडेसिविरच्या मागणीत घट झाली असून, रूग्णालयांनी त्याचा वापर करण्यास नकार दिला आहे. रेमडेसिविरची मागणी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर नोंदवावी लागते. त्यात रूग्णालयाची बेडची संख्या व त्यांना प्रदान करण्यात आलेल्या डोसची माहिती जाहीर केली जात असून, अनेक रूग्णालयांनी आपल्याकडील रूग्णांची माहिती प्रशासनाला देण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी आठ ते दहा हजारांची मागणी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आता तीनशे ते चारशेच्या घरात आली आहे. रेमडेसिविरच्या वापराबाबत प्रश्नचिन्हरेमडेसिविरच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बुधवार (दि. १९) रोजी ७५२ रेमडेसिविरची मात्रा जिल्ह्याला प्राप्त झाली. मात्र, ११७ रूग्णालयांनी त्यांची मागणी नोंदवलीच नाही. हेच प्रमाण शुक्रवार (दि. २१) रोजी कायम राहिले. अवघ्या ३०१ रेमडेसिविरची मागणी नोंदविण्यात आली व ७५ रूग्णालयांनी त्यांची मागणीच नोंदवलेली नव्हती. तर शनिवार (दि. २२) रोजी ४८१ रेमडेसिविर प्राप्त झाली, त्याचवेळी १०५ रूग्णालयांनी ही मात्रा घेण्यास नकार दिला आहे.