सटाणा (नाशिक) : तालुक्यातील मांगीतुंगी पर्वतावर कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या 108 फूट विशालकाय मूर्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक आज बुधवारी कलशाभिषेकने भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
बुधवारी सकाळी 8 वाजता मांगीतुंगी पहाडावर चेन्नई येथील कमल ढोलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सकाळी 10 वाजता गाजियाबादचे उद्योजक जम्बू प्रसाद जैन, विद्यप्रकाश जैन, सुरतचे उद्योजक संजय व अजय दिवाण यांच्या हस्ते कलशाभिषेक करण्यात आला.या सोहळ्यात गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माता, आर्यिका श्री चंदनामती माता या ऑनलाईन सहभागी होणार आहेत. भाविकांसाठी मोफत भोजनाची मूर्ती समितीने व्यवस्था केली आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी पीठाधीश रवींद्र किर्ती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महामंत्री संजय पापडीवाल, कार्याध्यक्ष अनिल जैन, डॉ. जीवन प्रकाश जैन, भूषण कासलीवाल, प्रदीप जैन, मनोज ठोळे, प्रमोद कासलीवाल यांची समिती कार्यरत आहे.