त्र्यंबकेश्वर : श्रीपंचदशनाथ जुना आखाड्याचे ब्रह्मलीन ठाणापती श्री महंंत शिपलागिरीजी महाराज यांच्या इच्छेनुसार त्यांच्या भक्तजनांनी व गुरुदेव सिद्धाश्रम, देगाव (वा.), जि. सोलापूर यांच्या अविश्रांत कष्टाने सुमारे ९००० किलो वजनाचा त्रिशूल जुना आखाड्यास अर्पण केला. सदर सोहळा बुधवारी भक्तजनांनी घडवून आणला. यावेळी श्रीमहंत हरिगिरीजी, प्रेमगिरीजी, नारायणगिरीजी महाराज तसेच महाराजांचा भक्त परिवार उपस्थित होता.शिपलागिरीजी महाराज शिष्य परिवारासह तीर्थयात्रा करीत असताना कुरुक्षेत्र येथे गेले असता दुर्दैवाने महाराजांनी कुरुक्षेत्रीच देहत्याग केला. ती तारीख होती २५ मे २०१२. त्यानंतर सर्वभक्तजनांनी महाराजांच्या इच्छेनुसार कुरुक्षेत्र येथून सदर त्रिशूल तयार करून आणला आहे. १९ आॅगस्ट २०१५ रोजी त्रिशुलाची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते औपचारिक पूजन केले होते. त्या नंतर त्रिशूल उभा करण्यात आला. आज त्रिशुलाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिपलागिरीजी महाराजांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, शिपलागिरी महाराज ब्रह्मलीन शिवगिरीजी महाराजांचे पहिले शिष्य होते. त्यांची कर्मभूमी सोलापूर जिल्हा असली तरी ते त्र्यंबक येथेच वास्तव्यास होते. कार्यक्रमास श्री महंत हरिगिरीजी, श्री महंत प्रेमगिरीजी व श्री महंत नारायणगिरीजी महाराज उपस्थित होते.
निलपर्वत आखाडा येथे १०८ फुटी त्रिशुलाचे लोकार्पण
By admin | Published: September 09, 2015 9:57 PM