नाशिक : कोरोनाचा एक रुग्ण सापडला की, लागलीच त्याच्या संपर्क, सान्निध्यातील व्यक्तींनाही त्याची लक्षणे दिसू लागतात, त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांना उपचारार्थ रुग्णालयात हलविणे गरजेचे असल्याने अशा वेळी राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्णांच्या मदतीला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कामी आली. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजतागायत या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जवळपास दीड हजारांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात तर काहींना उपचार करून सुखरूपपणे घरी सोडण्याचे कामही रुग्णवाहिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या ४६ रुग्णवाहिका असून, कोणत्याही आपत्तीप्रसंगी अवघ्या काही वेळात हव्या त्या ठिकाणी त्या रुग्णसेवेसाठी हजर असतात. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासूनच भविष्यातील संकटाची चाहूल ओळखून सुमारे १४ रुग्णवाहिका निव्वळ कोरोनाचे रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यामुळे निफाड तालुक्यात रुग्ण सापडल्यानंतर अवघ्या काही वेळातच ‘१०८’च्या माध्यमातून रुग्णाला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात आणण्याचे दिवस-रात्र काम केले जात असून, त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील आरोग्य केंंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना थेट मुख्यालयाच्या ठिकाणच्या रुग्णालयात दाखल करणे त्याचबरोबर गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्याला रुग्णालयात पोहोचविणे असे दोन मुख्य कामे १०८च्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे. या रुग्णवाहिकांसाठी ७५ प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व ११० चालक असून, रुग्णवाहिकेत जीवरक्षक साधनांसह वैद्यकीय उपकरणे सज्ज असून, प्रत्येक रुग्णाची वाहतूक केल्यानंतर संपूर्ण रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण केली जात आहे.१०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत कोरोनाचे ७४० रुग्ण रुग्णालयात पोहोचविण्यात आले असून, ८१३ संशयित रुग्णांना ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याशिवाय १०८च्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले व पूर्णपणे बरे झालेल्या ७०८ व्यक्तींना त्यांच्या घराच्या दारापर्यंतही पोहोचविण्याचे कामही पार पाडले आहे.----कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेनेदेखील आपली आरोग्य यंत्रणा बळकट केली असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या १०२ रुग्णवाहिकांची तपासणी केली असता, त्यातील ४० टक्के रुग्णवाहिका विविध कारणास्तव नादुरुस्त असल्याने त्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. सर्व रुग्णवाहिका आता सुसज्ज झाल्या असून, कोरोनाचा रुग्ण असो वा महिलांची प्रसूती, गंभीर आजाराचे रुग्णांना त्यातून तातडीने उपचारासाठी हलविले जात आहे.
दीड हजार रुग्णांसाठी देवदुतासारखी धावली ‘१०८’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:05 PM