नाशिक : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य शिक्षण मंडळानेही दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले असून, आता अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी निकष ठरविण्याची कार्यपद्धती ठरविण्यात येत आहे. त्यामुळे यंदा लेखी परीक्षा होणार नसून, पर्यवेक्षकांना मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त साहित्य, भरारी पथकांचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा मुद्रणखर्च असा खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला येणार नसल्याचे दहावीच्या विद्यार्थ्यांकडून जमा केलेले परीक्षा शुल्क शिक्षण मंडळ कधी परत करणार, असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्याने त्यासाठी खर्चही होणार नसल्याने, आता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्कही शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी नाशिकमधील पालकांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९५ हजार ९५९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून राज्य शिक्षण मंडळाने ४१५ रुपये परीक्षा शुल्क घेतले असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले आहे. याप्रमाणे, मंडळाकडे जवळपास ३ कोटी ९७ लाख ६८ हजार २०५ रुपये शुल्क यंदा जमा झाल्याचा अंदाज असून ही रक्कम मंडळाने विद्यार्थ्यांना परत करण्याची मागणी होत आहे.
--
पुढे काय होणार? विद्यार्थी संभ्रमात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्यच असला, तरी परीक्षाच होणार नसेल, तर निकाल कसा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, अकरावीसह तंत्रनिकेतन व आयटीआयसारखे प्रवेश कसे होणार, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- अथर्व जाधव, विदयार्थी, इंदिरानगर
---
शिक्षण मंडळ आणि शाळा प्रशासनाने समन्वय साधून दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याविषयी निर्णय घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन लवकरात लवकर करून निकाल जाहीर करावा, तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असेल, तर परीक्षेचे स्वरूप लवकरात लवकर जाहीर करावे.
- ओमकार गायधनी, विद्यार्थी नाशिक रोड.
----
शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या, तरी पुढील प्रवेशाविषयी अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मागील वर्ष वाया गेले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने अकरावीसह तंत्रशिक्षण प्रवेशाचे धोरण लवकर निश्चित करून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे अपेक्षित आहे.
किरण टिळे, विद्यार्थी, उपनगर
---
दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर तसे निर्देश विभागीय मंडळाला प्राप्त होती. त्यानुसार, विभागीय मंडळ अंमलबजावणी करेल.
- के.बी. पाटील, अध्यक्ष, विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक.
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा- १,०९०
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५
दहावीतील एकूण विद्यार्थी - ९५,९५९
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम -३,९७,६८,२०५