येवला : पंचायत समिती व जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी विविध गटासाठी चार उमेदवारांनी सहा तर गणासाठी तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेश बहिरम यांच्याकडे दाखल केले आहे. उमेदवारांनी समर्थकांसह तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.नगरसूल गटातून शिवसेनेच्या वतीने माजी आमदार मारोतराव पवार यांची सून सविता बाळासाहेब पवार, राजापूर गटातून शिवसेनेच्या वतीने नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा नरेंद्र दराडे, पाटोदा गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे सुपुत्र व बाजार समितीचे विद्यमान संचालक संजय बनकर यांनी दोन उमेदवारी अर्ज, अंदरसूल गटातून माजी सभापती महेंद्र काले यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करताना मारोतराव पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, संभाजी पवार, अरुण काळे तर राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल करताना माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, अशोक मेंगाणे, साहेबराव आहेर, बाळासाहेब पिंपरकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
येवला तालुक्यातून ११ अर्ज दाखल
By admin | Published: February 04, 2017 1:03 AM