नाशिक : महापालिकेने शासनाने ठरवून दिलेले ७५० कोटींचे उद्दिष्ट ओलांडल्याने एलबीटी अनुदान आणि मुद्रांक शुल्क एक टक्का अधिभाराची रक्कम आता मिळणार नसल्याचा दावा केला जात असतानाच शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या तीन महिन्यांची अधिभारापोटी सुमारे ११ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला वितरित करण्यास मान्यता दिली आहे. महापालिकेने जानेवारी २०१६ अखेर शासनाने ठरवून दिलेले ७५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडले आहे. त्यामुळे फेबु्रवारी व मार्च या पुढील दोन महिन्यांत मिळणारी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची एलबीटी अनुदानाची रक्कम, तसेच मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम मिळण्याची आशा मावळली होती. परंतु, शासन महापालिकेवर मेहरबान झाले असून आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांची एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची १० कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम शासनाने महापालिकेला वितरित करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या थकीत रकमा शासनाने महापालिकानिहाय वितरित केल्यानंतर उरलेल्या रकमेचे समायोजन करत त्या-त्या महापालिकांना रकमा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
मुद्रांक शुल्क अधिभारातून मनपाला ११ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2016 11:31 PM