एकीकडे नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा दर आठवडाभरापासून वाढला आहे, तर दुसरीकडे छातीत वेदना होऊन श्वास घेण्यास त्रास जाणवणे आणि चक्कर येऊन कोसळल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. अचानकपणे अशा प्रकारे नागरिकांचा राहत्या घरी मृत्यू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. आठवडाभरपूर्वी नऊ लोक अशा प्रकारे दगावले होते. सोमवारी पुन्हा या कारणांनी तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.
आशाबाई बनसोडे(५५,रा.सातपूर), रमेश चन्ना(६६,अशोकामार्ग), सुरेखा केंद्रे(५८,रा.गोविंदनगर), सुधाकर जठार(७०,रा. कामटवाडे), विलास बारगळ(५२,रा. सिन्नरफाटा), कचरू माळी(७८,रा. नाशिक रोड), सिकंदर सय्यद (६०, रा.नाशिक), वत्साबाई नरवडे (८१, रा.शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी), विमलबाई महाले(७९,पेठ रोड), ज्योती गायकवाड(४७, गंजमाळ) यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा वरील कारणांनी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आठवडाभरात अकस्मात मृत्यूच्या कारणांमध्ये चक्कर येऊन पडणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवणे ही प्रमुख लक्षणे दिसून येत आहेत.
कोट...
चक्कर येऊन अथवा छातीत दुखल्याने मृत्युमुखी पडलेल्या यापूर्वीच्या चार जणांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मेंदूत रक्तस्राव तसेच हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाला आहे. अशा प्रकारे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये वृध्दांची संख्या जास्त आहे. मंगळवारी (दि.२०) ज्यांचा अशा प्रकारे चक्कर येऊन मृत्यू झाला. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण कळू शकेल.
- डॉ. किशोर श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय
इन्फो...
चक्कर येणे किंवा तत्सम प्रकाराने मृत्यू झाल्याची स्वतंत्र नोंद नसते. संबंधित डॉक्टरांनी काय दाखला दिला त्यात ते स्पष्ट होऊ शकते, कारण चक्कर येऊन पडणे आणि मृत्यू हे हजार आजारांचे लक्षण आहे, असे महापालिकेचे कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.