सुभाषरोड जियाउद्दीन डेपो मटन मार्केट समोरील दाट लोकवस्ती असलेल्या कच्च्या, पक्क्या घराच्या व पत्र्याच्या झोपडपट्टीमध्ये शनिवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे एका झोपडीला आग लागली. अत्यंत दाट लोकवस्ती असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. जवळपासच्या ११ झोपड्यांना आगीने आपल्या विळख्यात घेतले. आग लागल्याचे रहिवाशांच्या लक्षात येतात त्वरित नाशिकरोड अग्निशमन दलाला कळविण्यात आले. तोपर्यंत परिसरातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच टप्प्याटप्प्याने अग्निशमन दलाो पाच बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सुमारे दीड ते दोन तासांंचे अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. शहराच्या विविध ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबांनी मुख्य अग्निशमन विभागाचे अधिकारी संजय बैरागी यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र बैरागी, अनिल जाधव, देवीदास चंद्रमोरे, राजेंद्र जाधव, राजेंद्र आहेर, शिवाजी खुलके, एस. के. आडके, मनोज साळवे, रामदास काळे, रमेश दाते आणि वाहन चालक रवींद्र काटे, फकिरा भालेराव यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पोलीस निरीक्षक गणेश न्याहाळदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांची गर्दी हटवली. आग विझविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख, सनी वाघ, राजाभाऊ वानखेडे, बाळा सोनवणे, भारत निकम, रामबाबा पठारे, अविनाश वाघ, बबलू खान, चेतन थोरात, अरुण गिरजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते धावून आले. या आगीत सुमारे १० ते १५ लाख रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
चौकट----
वृध्द महिला भागाबाई भगवान खरात यांच्या घराला सर्वप्रथम शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीचे बंब येईपर्यंत शेजारी राहणाऱ्या सोनम फराज, पराग निकाळजे, रेहना अहमद खान, सुनंदा कांतीलाल लोखंडे, नीलॉफर इस्माईल शेख, सय्यद अली मोहिद्दिन, बेबीबाई अशोक रोकडे, सरोज मोराईस, शहिदा अहमद खान, सखाराम लक्ष्मण कसबे यांच्या घरांपर्यंत आग पोहचून त्यांचे मोठे नुकसान झाले.
(फोटो ०६ आग)