गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवलीत १७ फेब्रुवारी रोजी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून भूमाफियांनी भूधारक रमेश वाळू मंडलिक (७०) यांची क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. दस्तुरखुद्द दीपक पांडेय यांनी या गुन्ह्याच्या तपासात लक्ष घालून पासाला वेळोवेळी दिशा दिली. या खुनाच्या घटनेत भूमाफियांनी कट रचल्याचे समोर आल्याने त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला. तसेच त्यांच्याभोवती मोक्काचा फासही आवळला.
मोक्कानुसार करण्यात आलेल्या कारवाईला प्रस्तावाला अपर पोलीस महासंचालकांनीही मंजुरी देत विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यावर विशेष मोक्का न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या समोर सुनावणीसाठी आले. मंगळवारी सकाळपासूनच बचाव आणि सरकारी पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने मोक्का तपासासाठी ४५ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. यावेळी तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त समीर शेख हजर होते. या गुन्ह्यात पोलिसांनी ११ संशयितांना अटक केली असून, त्यातील एकाने मोक्का लागण्यापूर्वी जिल्हा कोर्टातून जामीन मिळवून घेतला आहे. उर्वरित दहा संशयितांचा २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीचा मुक्काम वाढला आहे.
--कोट---
भूमाफियांच्या टोळीवर मोक्कांतर्गत पोलिसांकडून कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रथमदर्शनी मोक्काअंतर्गत कारवाई करता येऊ शकेल, असे सरकार पक्षाने दाखवून दिले. त्यामुळे विशेष न्यायालयाने मोक्काच्या तपासासाठी मुदतवाढ दिली आहे. अटक संशयित आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांच्या तपासाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.
- ॲड. डॉ. सुधीर कोतवाल, विशेष सरकारी वकील