शहरात ११ वी कला शाखेसाठी २ हजार ६८०, वाणिज्य शाखेसाठी ८४० तर विज्ञान शाखेसाठी २ हजार ४४० जागा आहेत. तालुक्यात कला शाखेसाठी ३ हजार १२०, वाणिज्य शाखेसाठी ४०० तर विज्ञान शाखेसाठी १ हजार ६०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यावर्षी बहुतांश शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने सर्व शाखांसाठी कटऑफ वाढणार आहे. मालेगाव तालुक्यातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे. नाशिक महानगर क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यांसाठी अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी जाहीर केले आहे. अकरावीतील प्रवेश ऑफलाइन पद्धतीने बेस्ट ऑफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार घेण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इन्फो
...अशी आहे प्रवेश प्रक्रिया
प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्याध्यापक, प्राचार्य यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्यात सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पावती पाटील, शिक्षण उपनिरीक्षक अशोक बागूल यांनी मार्गदर्शन केले. २० ते २४ ऑगस्टपर्यंत प्रवेश अर्ज विक्री केले जातील. २७ पर्यंत छाननी होऊन गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. ४ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.