नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेला नाशिकमधील ४६ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ११ हजार ७४८ परीक्षार्थींनी हजेरी लावली, तर तब्बल ६ हजार ३२३ जणांनी या परीक्षेला दांडी मारली. विशेष म्हणजे सकाळच्या सत्रात उपस्थित असणाऱ्या ११ हजार ८०१ परीक्षार्थींपैकी ५३ जणांनी दुसऱ्या सत्रातील परीक्षा टाळल्याचे दिसून आले.
एमपीएससीतर्फे कोरोनाच्या सावटात रविवारी (दि.२१) राजपत्रित अधिकारी वर्ग अ गटातील पदांसाठी नाशिक शहरातील ४६ केंद्रांवर सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पूर्वपरीक्षा घेण्यात आली. नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने परीक्षार्थींना सकाळी ८ वाजेपासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आल्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत प्रथम सत्रातील पेपर झाला. सकाळच्या सत्रात ११ हजार ८०१ परीक्षार्थी उपस्थित होते. तर ६ हजार २७० परीक्षार्थी गैरहजर होते. प्रथम सत्राचा पेपर झाल्यानंतर तब्बल तीन तास विश्रांतीनंतर दुपारच्या सत्रात ३ ते ५ यावेळेत पेपर झाला. दुपारच्या सत्रात सकाळी उपस्थित असलेल्यांपैकी ५३ जणांनी पेपर देणे टाळल्याने दुपार सत्रात ११ हजार ७४८ परीक्षार्थीच उपस्थित होते. त्यामुळे या परीक्षेला सकाळ सत्रात असलेली ६ हजार २७० परीक्षार्थींची अनुपस्थिती वाढून दुपारच्या सत्रात ६ हजार ३२३ पर्यंत पोहोचली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी इतिहासासंबधी काही अनपेक्षित प्रश्न विचारले गेल्याचे सांगतानाच प्रशासाने केलेल्या उपाययोजनांमुळे परीक्षा देणे सोयीचे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच यापुढेही परीक्षा स्थगित न करता सर्वच परीक्षा अशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घेण्याची मागणीही केली.
इन्फो-
पीपीई किटसह दिली परीक्षा
कोरोनाच्या सावटात शहरात हजारो परीक्षार्थी विविध परीक्षा केंद्रांवर देत असताना नाशिकरोड येथील के. जे. महेता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष कोरोनाची लक्षणे असलेल्या परीक्षार्थीने परीक्षा दिली. या विद्यार्थ्यासाठी परीक्षा केंद्रावर पीपीई किटची तसेच वेगळ्या वर्ग खोलीची सोय करण्यात आली होती.
इन्फो-
विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नाशिक शहरातील विविध केंद्रांवर युवासेनेच्या वतीने परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सारडा कन्या विद्यालय येथे भविष्यातील अधिकारी- कर्मचारी होऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थींना युवासेनेचे गणेश बर्वे, रूपेश पालकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी किरण पाटील, कल्पेश पिंगळे, प्रथमेश भोरे, अमोल कुंभकर्ण, प्रसाद वाबळे, लुमान मणियार, शुभम पवार आदी उपस्थित होते.
===Photopath===
210321\21nsk_21_21032021_13.jpg~210321\21nsk_22_21032021_13.jpg
===Caption===
एमपीएससी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर रांगेत उभे विद्यार्थी ~एमपीएससी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर रांगेत उभे विद्यार्थी