निफाड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यातील ११ गावांमध्ये लोकसहभागातून, ग्रामपंचायत तसेच वैयक्तिक स्तरावर नदी, नाले, पाझर तलाव, बंधारे यांतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार व जील्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अर्जुन गोटे यांनी दिली. गाळ काढताना जर मुरूम, वाळू या गौणखनिजांचा साठा आढळून आला व त्याची वाहतूक करायची असेल, तर त्याची शासनाकडे रॉयल्टी भरावी लागेल. त्याशिवाय वाळू, मुरूम यांची वाहतूक करता येणार नाही. नदी, नाले, पाझर तलाव यातील गाळ काढण्याचा खर्च संबंधित संस्था, ग्राम पंचायत व शेतकरी यांना करावा लागेल.रानवड येथील ७ बंधारे, पाचोरे वणी येथील ५ ते ६ बंधारे, कुंदेवाडी येथील अजय सागर तलाव, निमगाव वाकडा येथील शिवनदी, पिंपळगाव नजिक येथील शिवनदी, सावरगाव, नांदूर खुर्द येथील पाझर तलाव आदि जलस्रोतातील गाळ काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रथमच तालुक्यात टँकरची संख्या दोन अंकी झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, आहे ते जलस्रोत दुरुस्त करणे व अशा पद्धतीने जमिनीत जलसाठे निर्माण करणे व या पाण्यावर आगामी काळात शेती व्यवसाय वाचवणे हा विचार सध्या तालुक्यात रुजू लागला आहे. म्हणून यावर्षी विविध जलस्रोतातील गाळ काढण्यासाठी गावे आता पुढे येऊ लागली आहेत. तालुक्यातील पिंपळगावनजीक येथे सरपंच शांताराम घोडे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहभागाने शिव नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. टाकळी-विंचूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहभागातून गाळ काढण्याचा प्रारंभ करण्यात आला. (वार्ताहर)
११ गावांना गाळ काढण्याची परवानगी
By admin | Published: May 15, 2016 10:09 PM