नाशिक : नाशिक शहरातील वाढती लोकसंख्या व त्यासाठी देण्यात आलेले नळ कनेक्शन पाहता घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे ११० कोटी रुपये खर्च येतो या खर्चाच्या मोबदल्यात फक्त ५० टक्केच पाणीपट्टी वसूल होत आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
महापालिकेच्या हद्दीतील सहाही विभागाचा विस्तार होत असून, नवनवीन वसाहती उभ्या राहत असल्याने साऱ्यांच्याच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला करावी लागत आहे. नवीन पाइपलाइन व जलकुंभांच्या निर्मितीतून सध्या सुमारे दोन लाख घरांना पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांना वेळेवर व नियमित पुरेसा पाणीपुरवठा करण्याकामी उभ्या केलेल्या यंत्रणेवर तसेच धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापोटी महापालिकेला दरवर्षी सुमारे ११० कोटी रुपये खर्च करावे लागतात.
मात्र, त्या तुलनेने पाणीपट्टी कमी वसूल होते. घरगुती, व्यावसायिक व व्यावसायिक संस्थांसाठी पाण्याचे दर वेगवेगळे असले तरी, हजारो लोक पाणीपट्टी नियमित भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, दरवर्षी महापालिकेला येणे असलेले पाणीपट्टीचे उत्पन्न घटू लागले आहे. साधारणत: दरवर्षी ५० टक्क्यापर्यंत पाणीपट्टी वसूल होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.