नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.गंजमाळ हा शहराच्या मध्यवस्तीतील रहिवासी भाग असून, दाट वस्तीच्या या भागात शनिवारी (दि.२५) अचानक आग लागली. अनेक घरांत सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि आग आटोक्यात आणली. मात्र, त्यानंतरही अनेक घरे भस्मसात झाली, तर साडेसहाशे नागरिक बेघर झाले आहे. एकापाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतरदेखिल जीवितहानी टळली ही या दुर्घटनेत सुदैवाची बाब ठरली.दरम्यान, आगीच्या घटनेनंतर महापालिकेने संबंधित विस्थापित नागरिकांची जवळच्याच बी. डी. भालेकर मैदान आणि मनपा शाळा क्रमांक सहामध्ये व्यवस्था केली. याशिवाय रविवारची सुटी असल्याने शनिवारीच घाईघाईने सर्व पंचनामे उरकण्यात आले. त्यानुसार ११ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, ६५० नागरिक बेघर झाल्याचा अहवाल सायंकाळी तयार करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून या नागरिकांनातातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. दरम्यान रविवारी या नागरिकांना विविध संस्थांतर्फे मदत देण्यात आली.भीमवाडी आणि महापालिकेचे अग्निशमन दलाचे कार्यालयातील अंतर अत्यंत कमी असतानादेखील अग्निशमक दलाचे बंब वेळेत पोहोचले नाहीत, त्याचप्रमाणे संपूर्ण आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजू देसले यांनी केली आहे, तर याठिकाणी झोपडपट्टी घोषित करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी तसेच अर्धवट स्थितीत असलेली महापालिकेची घरकुल योजना पूर्ण करावी, अशी मागणी शेकापचे अॅड. मनीष बस्ते यांनी केली आहे.
११२ घरे भस्मसात, ६५० नागरिक बेघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:52 PM
गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
ठळक मुद्देमनपाकडून पंचनामा : नुकसानभरपाईबाबत आज निर्णय