नाशिक: गुजरातकडे सरकणाऱ्या चक्रीवादळामुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याचा फटका सुरगाणा तालुक्याला बसला. गुजरातच्या सीमारेषेवर असलेल्या या तालुक्यात वादाळामुळे ११२ घरांचे छप्पर उडाले तर काही घरांच्या भिंती कोसळल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. चार प्राथमिक शाळा तसेच तीन अंगणवाड्यांची देखील पडझड झाल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे.
''तौक्ते'' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून जिल्ह्यातील सुरगाण्यासह पाच तालुक्यात ''ऑरेंज अलर्ट'' जारी करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल भागातील काही घाटमाथ्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला होता. गुजरातकडे सरकणाऱ्या चक्रीवादळामुळे सीमारेषेवरील तालुक्यांना सतर्कतेच्या सूचना असल्याने प्रशासनाकडून देखील दक्षता घेण्यात आली होती. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेला वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील नागरिकांची धावपळ झाली. सकाळच्या सुमारास असलेल्या वाऱ्याचा वेग दुपारपर्यंत कायम होता. या वादळाचा सर्वाधिक फटका सुरगाणा तालुक्यातील गावांना बसला.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे सुरगाण्यात ११२ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांचे पत्र उडाले तर अनेक घरांच्या भिती देखील पडल्या आहेत. तीन अंगणवाड्यांसह चार प्राथमिक शाळांची देखील पडझड झाली. दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे देखील मोठे नुकसान झाले. या केंद्रांच्या आवारातील झाडे केंद्रांवर पडल्याचे सांगण्यात आले.
या भागात फळबागा असल्याने शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला असण्याची शक्यता आहे. अद्याप शेतपिकांच्या नुुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाही. वादळाचा प्रभाव कमी होताच यंत्रणेकडून पंचनामे केले जाणार आहेत. बुधवारी (दि.१८) देखील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल वादळवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्यामुळे नुकसानीचा अंदाज वाढण्याची शक्यता आहे.
--इन्फो--
नुकसानीकडे लक्ष
ज्या तालुक्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता त्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूलसह जिल्ह्यातील अन्य भागातील देखील आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात असून पुढील दोन दिवसात नुकसानीचा एकूण अंदाज समेार येणार आहे. प्राथमिक अहवालावरून सुरगाण्यासह अन्य ठिकाणी देखील पावसामुळे नुकसान झाल्याचे समजते.