नाशिक : आंबेडकरी चळवळीतील पक्ष, संघटना व गटाने एकत्र येत निवडणूक लढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. आंबेडकरवादी रिपब्लिकन आघाडीने दहा उमेदवारांना उमेदवारी तर दोघांना पुरस्कृत केले आहे. रविवारी आंबेडकरवादी आघाडीची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला. आंबेडकर चळवळीतील सर्व छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधत मागासवर्गीय समाजाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी ही आघाडी करण्यात आली होती. सुरुवातीला या आघाडीत डझनभर पक्षांनी सहभाग नोंदवित ऐक्याच्या हाकेला प्रतिसाद दिला, मात्र नंतर इतर पक्षांनी दाखविलेल्या प्रलोभनांना बळी पडून अनेकांनी आघाडीकडे पाठ फिरविली. या आघाडीकडून ८० इच्छुकांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांची निष्ठा व चारित्र्य पडताळणी करता अवघे ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतिमत: दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले असून, दोघांना पुरस्कृत करण्याचे ठरल्याची माहिती अण्णासाहेब कटारे, आदेश पगारे, नाना भालेराव यांनी कळविले आहे. आघाडीचे उमेदवार दिनेश उन्हवणे (४ड), गणेश धोत्रे (६ड), शशिकला जगताप (११अ), कोळप्पा धोत्रे (११क), अलका गांगुर्डे (१४अ), मुशीर सय्यद (१४क), कैलास तेलोरे (१७ड), संजय पगारे (२०अ), संतोष लोळगे (२४ड), नंदकुमार कर्डक (२७अ) हे असून, रोहिणी जाधव (१अ) व वैशाली काळे (१२अ) हे पुरस्कृत आहेत. (प्रतिनिधी)
आंबेडकरवादी आघाडीचे १२ उमेदवार जाहीर
By admin | Published: February 12, 2017 11:44 PM