नाशिक - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून या गटातील सुमारे १२ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे.यामध्ये नाशिक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या बरोबरच सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले या माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातील येशील काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्याचे खंडन केले होते. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतून कोणीही फुटणार नसल्याचा दावा केला होता मात्र त्यांची पाठ फिरताच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.