मालेगाव : जगात सर्वत्र ओमायक्रॉनची चर्चा सुरू असताना परदेशातून १२ जण मालेगाव शहरात परतले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सर्व जणांची मनपा आरोग्य विभागाने आरटीपीसीआर टेस्ट केली असून, त्यात कुणीही बाधित न आल्याने आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला आहे. दरम्यान, या बाराही जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी दिली.
विशेष म्हणजे, परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी काही जणांनी पुणे, नाशिक, मनमाड, दिल्ली असा प्रवास केला आहे. एक जण मुंबईहून रेल्वेने दिल्लीला जाऊन पुन्हा मालेगावला आला आहे. यात कुणी बाधित मिळालेले नसले, तरी एखादा जर बाधित आढळून आला असता, तर गावोगावी त्यांनी केलेल्या प्रवासामुळे डोकेदुखी ठरली असती. परदेशातून मालेगावी आलेल्या नागरिकात सौदी-२, यू.एस. १, टांझानिया- १, तुर्कीहून ४ आणि दक्षिण आफ्रिकेतून ४ अशा १२ जणांचा समावेश आहे. त्यापैकी सोयगावच्या भुसे काॅलनीतील ४ जण दक्षिण आफ्रिकेतून शहरात आले असून, ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत. भुसे कॉलनीतील परदेशातून २१ नोव्हेंबर रोजी आलेल्या नागरिकांपैकी तिघांनी सटाणा, नाशिक आणि पुणे असा प्रवास केला आहे. याखेरीज रमजानपुऱ्यातील २ आणि आयेशानगरातील १ जण तुर्कीहून आला आहे. सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आलेली असली, तरी आठ दिवसांनंतर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. परदेशातून आलेल्या सर्व १२ जणांवर मनपा आरोग्य विभागाची नजर आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बंद पडलेले सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. मालेगाव शहरात ४० टक्के लसीकरण झाले असून, मालेगाव बाह्यमध्ये ९३ टक्के तर मालेगाव मध्य भागात अत्यल्प लसीकरण झाले आहे. धार्मिक पगडा असल्याने काेरोना लसीकरणासपूर्व भागात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ.सपना ठाकरे यांनी सांगितले. शहरात ५२ लसीकरण केंद्र सुरू असून, दिवसा आणि रात्री देखील लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.