नाशिक : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव एका वर्षाच्या खंडानंतर भाविकांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली असून, भाविकांना दर्शनासाठी कोविडच्या अटी-शर्तीनुसार ऑनलाईन पास काढावा लागणार आहे. ताशी १२०० भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, असे प्राथमिक नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
देवी भक्त, भाविकांची सुरक्षितता , आरोग्य व वाहतूक यांच्यावर प्रशासनाकडून विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक झाली. गडावर ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव तर, १९ व २० ऑक्टोबरदरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सव होत आहे . दर्शनासाठी ऑनलाइन पासची अट व पाससाठी कोविड प्रतिबंधात्मक दोन डोसची किंवा ७२ तासांपर्यंत कोविड रॅपिड टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट प्रशासनाने अनिवार्य असल्याचा निर्णय घेतल्याने भाविकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडणार असून भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत . आढावा बैठकीस कावड यात्रेसंदर्भात प्रशासनाने निर्णय घेतलेला नसून याबाबत नियोजन करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मीना यांनी दिली.
-------------------
इन्फो
दहा रुग्णवाहिका तैनात
आरोग्य यंत्रणेने गडावरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र , ट्रस्ट दवाखाना , रामटप्पा आदी ठिकाणांबरोबरच बसस्थानक पाय रस्ता या ठिकाणी भाविकांसाठी उपचार केंद्र उभारण्याच्या सूचना देत दहा रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ . अनंत पवार यांनी दिली.
इन्फो
२४ तास दर्शन सुविधा उपलब्ध
गडावर देवी भक्त आणि भाविकांना २४ तास दर्शन सुविधा उपलब्ध राहणार असून तासाला १२०० भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे. पाच वर्षांखालील बालके व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. फ्युनिक्युलर ट्रॉलीद्वारे तासाला ४०० भाविकांची मंदिरापर्यंत ने - आण करण्यात येणार आहे. बाहेरील व्यावसायिकांना गडावर दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आली असून नांदुरी ते सप्तशृंगगड रस्त्यावर नवरात्रोत्सवात खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय शिवालय तलावात स्नानासाठी बंदी असून सप्तशृंगगड ग्रामस्थांना गडावर ये - जा करण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. मंदिर व परिसरात तासाच्या अंतराने सॅनिटायझिंग करण्यात येणार असून मंदिर परिसरात बोकडबळी बंदी कायम राहणार आहे, आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.