महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या संदर्भात तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर होती. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रुग्ण वाढू लागले, तेव्हा नागरिकांनी गृहविलगीकरणावर भर दिला. मात्र, नंतर जस जशी गंभीर स्थिती निर्माण झाली, तशी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली, परंतु सामान्यत: लक्षणे असणाऱ्या आणि त्रास न होणाऱ्या बहुतांशी नागरिकांनी घरीच उपचार घेतलेे आणि ज्यांना श्वसनाला त्रास होऊ लागला, त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे जनरल बेडपेक्षा ऑक्सिजन बेडलाच अधिक मागणी होती. त्यामुळे सिडकोतील सावरकर सभागृह, संभाजी स्टेडियम, तसेच पंचवटीतील स्टेडियममध्ये महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेडलाच अधिक मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा हा विषय केंद्रस्थानी ठेवून नियोजन सुरू केले आहे.
महापालिकेच्या वतीने नवीन बिटको रुग्णालय आणि झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसविण्यात येणार आहेत, तसेच अतिरिक्त ऑक्सिजन टाक्याही उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय आता बहुतांशी कोविड केअर सेंटर्समध्येही केवळ ऑक्सिजन बेडसचे नियोजन करण्यात येणार असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये दोनशे, तसेच महापालिकेच्या संभाजी स्टेडियममध्येही दोनशे ऑक्सिजन बेडसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
इन्फो....
ठक्कर सेंटर केवळ यासाठीच बंद...
सध्या रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने, ठक्कर कोविड सेंटर बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे सेंटर बंद करण्यात येणार नसून, या ठिकाणी ऑक्सिजन केवळ बेड्सची सेाय करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.