नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कमी होत असून आठवडाभरात बारा हजार सक्रिय रुग्णसंख्या घटली आहे. आठवडाभरापूर्वी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत ५४ हजार ८२८ रुग्ण होते. आता ही संख्या ४३ हजारांपेक्षा कमी झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणदेखील ९४.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
नाशिक विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत फेब्रुवारी अखेरपासून रुग्णसंख्या वाढू लागली. त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात हेच प्रमाण प्रचंड वाढले होते. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश रुग्ण नाशिक शहरातच उपचारासाठी दाखल होत असून त्यामुळे नाशिकमधील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत ताण वाढला होता. बेड मिळविण्यातदेखील अडचणी येत हेात्या. मात्र, आता घटणाऱ्या रुग्णसंख्येने मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात रविवारपर्यंत (दि. १६) ५४ हजार ८२८ कोरेानाबाधितांची संख्या होती. ती रविवारपर्यंत (दि.२३) ही संख्या कमी झाली असून ती आता ४२ हजार ९६५ झाली आहे. आरोग्य उपसंचालकांनी दिलेल्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत विभागातील ३ हजार ५८९ नवीन बाधित आढळले आहेत तर ५ हजार २१९ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच १६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९३ टक्के हेाते ते आता ९४.६४ टक्के इतके झाले आहे. तर मृत्युदर १.३१ इतका आहे.
इन्फो...
दाेन टक्के रुग्ण व्हेंटिलेटर्सवर
उत्तर महाराष्ट्रात गेल्या मार्च महिन्यांपासून आतापर्यंत ८ लाख ४४ हजार ५२४ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात ७ लाख ८९ हजार ८२० रुग्ण बरे झाले आहेत तर एकूण ११ हजार १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचाराधिन रुग्णांमध्ये नाशिक जिल्ह्यात १६ हजार ६६, जळगाव जिल्ह्यात ८ हजार ३०६, धुळे जिल्ह्यात १हजार २२९, नंदुरबार १ हजार ४९ आणि अहमदनगर जिल्ह्यांत १६ हजार ३१५ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील अवघे २.४ टक्के म्हणजे १ हजार १३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत तर ४.३ टक्के म्हणजेच १४३३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.