नाशिक : महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आणलेल्या मोबाइल अॅप्सवर पहिल्याच दिवशी सुमारे १२५ तक्रारी दाखल झाल्या, तर सुमारे दोन हजार नागरिकांनी अॅप्स डाउनलोड केले. ड्रेनेज, आरोग्य व विद्युत विभागातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना आता घरबसल्या तक्रारींची सुविधा प्राप्त झाली असली, तरी प्रशासनाला दिलेल्या मुदतीत तक्रारींचे निवारण करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अॅप्सचे लोकार्पण मंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाल्यानंतर दीड दिवसात शहरातील सुमारे दोन हजार नागरिकांनी अॅप्सचे रजिस्ट्रेशन करत डाउनलोड करून घेतले. त्यानंतर, बुधवारी पहिल्याच दिवशी अॅप्सवर सुमारे १२५ तक्रारी प्राप्त झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वसाधारपणे, महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे महिन्याला सुमारे ३२५ ते ३५० तक्रारी प्राप्त होत असतात. परंतु आता मोबाइल अॅप्समुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारी अथवा सूचना मांडणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या या अॅप्सबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेच्या गतिमान प्रशासनाचे कौतुक केले जात असतानाच या अॅप्सच्या उपयुक्ततेबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. प्रामुख्याने नगरसेवकांकडून अॅपपेक्षा प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा गॅप भरून काढण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी अॅपवर तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी करण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. आयुक्तांनीही त्याबाबत पुढील दोन महिने आव्हानात्मक असल्याची कबुली दिली आहे. या गतिमान प्रशासनाचा धसका आता काही अधिकाऱ्यांनीही घेतला असून ‘रात्रंदिन आता आम्हा युद्धाचा प्रसंग’अशी टीपणीही महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
पहिल्याच दिवशी १२५ तक्रारी
By admin | Published: September 17, 2015 12:07 AM