नाशिक शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधीत आढळले. परंतु, त्याचबरोबर रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. विशेषत: मधुमेही असलेल्या अनेक रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जावे लागत आहे. सध्या हा सर्वाधिक चिंताजनक विषय आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत पाच रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. अर्थात, या आजाराचे रुग्ण खासगी वैद्यकीय व्यावसायिक म्हणजेच नाक, कान, घसा तज्ज्ञ, दंत रोग तज्ज्ञ, मेंदू रोग तज्ज्ञ यांच्याकडे उपचार घेत आहेत. तसेच अनेक जण इंजेक्शन, तसेच शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात त्यांच्या उपचाराची सोय नसल्याने अद्यापही खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याची माहिती महापालिकेला उपलब्ध होत नव्हती. मात्र, म्युकरमायकोसिस रुग्णांच्या आजारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचे नियंत्रण महापालिकेकडे येऊ घातल्यानंतर प्रशासनाने आधी रुग्णांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सादर करण्याची सूचना खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना दिली. त्यानंतर त्यांना इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता रुग्णालयांनी माहिती पाठविण्यास सुरुवात केली आहे. शहरात आतापर्यंत १२७ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने सहा विभागात सहा पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे. हे केवळ दवाखाना स्वरूपात असतील अशी माहिती जाधव यांनी सांगितली. त्यात शस्त्रक्रिया केल्या जाणार नाही, केवळ लक्षणे बघून उपचार केले जातील असे जाधव यांनी सांगितले.
इन्फो...
बालरोग तज्ज्ञांना ओटी उपलब्ध करून देणार
महापालिकेच्या नवीन बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारांसाठी ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेकडे सर्जन उपलब्ध नसल्याने खासगी डॉक्टरांना ते शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.