वडांगळी : वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजनेला मुबलक पाणी असतानाही त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने तीन ते चार दिवसआड पाणी मिळत असल्याची तक्रार मेंढी चे उपसरपंच सीताराम गिते यांनी केली आहे. मुबलक पाणी असूनही योजनेत समाविष्ट गावांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा गिते यांनी दिला आहे. सदर योजनेच्या देखरेखीसाठी कर्मचारी नाही. योजनेचा सर्व कारभार रामभरोसे सुरू असल्याचे गिते यांचे म्हणणे आहे. योजनेत समाविष्ट गावांना पाणी हवे असल्यास स्वत: सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना पाणी सोडण्यासाठी जावे लागत असल्याचे गिते यांचे म्हणणे आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांच्याकडून उडावाउडवीचे उत्तरे दिले मिळत असल्याचे गिते यांनी पत्रकात म्हटले आहे. काही लोकप्रतिनिधींनी राजकीय प्रतिष्ठेपोटी सदर योजनेवर समिती गठित करण्यास विरोध केला होता. तसेच समिती गठीत करण्याच्यावेळी गटविकास अधिकारी हजर नसल्याचा आरोप गिते यांनी केला आहे. त्यामुळे आज या योजनेला मुबलक पाणी असतानाही पूर्व भागातील गावांना टंचाईला समोरे जावे लागत आहे. योजनेतील सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी उपाय योजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गिते यांनी दिला आहे. (वार्ताहर)
१३ गाव पाणीपुरवठा योजनेत कृत्रिम टंचाई
By admin | Published: August 21, 2016 1:05 AM