मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासन व महापालिकेने गेल्या दोन वर्षांत तब्बल सुमारे १३ कोटी रुपये खर्च केले आहेत. या खर्चातून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे शहराची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षी ८ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. बळींची संख्या ही दिवसागणिक वाढत होती, त्यामुळे महापालिका प्रशासन पुरते हतबल झाले होते. शासनाने मालेगावकडे विशेष लक्ष दिले. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व डीपीडीसीतून दोन टप्प्यांत ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तर महापालिकेने गेल्या दोन वर्षांत पहिल्या टप्प्यात ६ कोटी व यंदाच्या वर्षात ६ कोटी असे एकूण अंदाजपत्रकात १४ कोटींची तरतूद केली आहे. या निधीतून महापालिकेने ३ कोटी रुपयांचा औषधसाठा व १ कोटी ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले आहेत.
--------------------
दुसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या लाटेत अधिक खर्च
महापालिकेच्या मसगा, सहारा, हजहाऊस, दिलावर हॉल या चारही कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना जेवण पुरविण्यात आले, यावरही मोठा खर्च झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत खर्चाचे प्रमाण अधिक होते. दुसऱ्या लाटेत सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे फारसा खर्च झाला नाही. महापालिकेकडे शासन अनुदानातील सुमारे २ कोटी रुपये शिल्लक आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेला आर्थिक फटका सहन करावा लागला. याचा परिणाम शहरातील विकासकामांवर झाला आहे.
----------------------
शासन व महापालिका निधीतून तातडीने कोविड सेंटर उभारण्यात आले, त्या ठिकाणी पुरेशा सुविधा करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय पथके करण्यात आली. वेळेवर औषधे खरेदी करण्यात येऊन ती पुरवण्यात आली. यावर महापालिकेचा कोरोना काळात खर्च झाला आहे
-रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त, मनपा मालेगाव