नाशिक : प्रत्येक पुण्यकर्माचा सत्तरपटीने अधिक मोबदला मिळवून देणाऱ्या पवित्र रमजान पर्वला सोमवारी (दि.११) संध्याकाळी घडलेल्या चंद्रदर्शनाने प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी (दि.१२) पहाटे ५वाजून २८ मिनिटांपासून मुस्लीम बांधवांनी रमजानच्या पहिल्या उपवासाला (रोजा) प्रारंभ केला. सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे.
मुस्लीम बांधव ११महिन्यांपासून आतुरतेने रमजान पर्वची प्रतीक्षा करत होते. शाबान या अरबी महिन्याच्या २९तारखेला सोमवारी सायंकाळी स्पष्ट चंद्रदर्शन घडताच समाजबांधवांमध्ये आनंदाची लहर पसरली. इस्लामी कालगणनेतील रमजानुल मुबारक हा नववा महिना आहे. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. निर्जळी उपवासांचा महिना म्हणून रमजान ओळखला जातो. या महिन्याची तीन खंडात विभागणी करण्यात आली आहे. पहिले दहा दिवस हे कृपाखंडाचे त्यानंतर मोक्षखंडाचे दहा दिवस अन् शेवटचा खंड हा नरकापासून मुक्ती मिळविण्याचा मानला जातो. या महिन्यात समाजबांधव अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी (इबादत) देतात. यामुळे संपुर्ण दिनचर्या बदललेली पहावयास मिळते. मोहल्ले पहाटेपासूनच गजबजत असून अबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तसेच संध्याकाळी बाजारपेठांमध्येही चैतन्याचे वातावरण पहावयास मिळत आहे. हंगामी ‘मिनी मार्केट’ शहरातील मुस्लीमबहुल भागात थाटू लागले आहेत.
काय आहे ‘सहेरी’ अन् ‘इफ्तार’सुर्योदयाच्या साधारणत: दोन तास अगोदर पहाटेच्या सुमारास घ्यावयाच्या अल्पोहाराच्या विधीला ‘सहेरी’ असे म्हटले जाते. ठराविक वेळेत हा विधी पार पाडावयाचा असतो. रमजानचे विशेष वेळापत्रकात नमूद वेळेप्रमाणे सहेरी व इफ्तार आटोपायचा असतो. तसेच सुर्यास्ताच्यावेळी सायंकाळी उपवास सोडण्याच्या विधीला ‘इफ्तार’ असे म्हटले जाते.
‘तरावीह’चे नमाजपठण; मशिदींमध्ये गर्दीशहर व परिसरातील मशिदींमध्ये नमाज, कुराणपठणाकरिता समाजबांधवांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे सर्वच मशिदींमध्ये बैठकव्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुबलक प्रमाणात पाणी, विद्यूत व्यवस्था अद्ययावत करण्यात आली आहे. उपासनेसाठी येणाऱ्या नागरिकांची कुठल्याहीप्रकारे गैरसोय होऊ नये, याची खबरदारी प्रत्येक मशिदींमध्ये घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये ‘तरावीह’चे नमाजपठण केले जात आहे. यादरम्यान, धर्मगुरूंकडून कुराणचे मुखोद्गत पठण करण्यात येते.