नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चौदा वर्षे शिक्षा भोगून झालेल्या व ६५ वर्षे वयापुढील तेरा कैद्यांच्या शिक्षेत सूट देऊन त्यांना शुक्रवारी कारागृहातून मुक्त करण्यात आले. ज्या कैद्यांच्या शिक्षेला चौदा वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ज्या कैद्यांचे वय ६५ च्या पुढे झालेले आहे अशा कैद्यांच्या संदर्भात न्यायनिवाडा करून त्यांना कारागृह प्रशासनाने शिक्षेत सूट जाहीर करून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता नेमण्यात आलेल्या समितीत न्या. वैष्णव, कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे, कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, नाशिक पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील वाघचौरे, वरिष्ठ तुरुंग अधीक्षक अशोक कारकर, श्यामराव गिते आदींची नियुक्ती करण्यात आली होती. यासंदर्भात समितीच्या निर्णयानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी प्रभाकर नथू धनगर, व्यंकट ईश्वर पावडे, गोविंद ईश्वर पावडे, चतुर कारभारी राऊत, छगन सीताराम मालुसरे, बारकू भावराव भास्कर, मुरहरी तानाजी फड, मारुती बालाजी डेंगळे, शेटीबा केरबा लोखंडे, देवमन भगवान पाटील, माईबाई छगन मालुसरे, खुशालबाई मुरहरी फड, बाबुराव रामचंद्र गायकवाड या तेरा कैद्यांची शुक्रवारी कारागृहातून मुक्तता करण्यात आली. राज्य शासन व कारागृह प्रशासनाने शिक्षा भोगत असलेल्या ज्येष्ठ कैद्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लवकर झाल्याने सुटलेले कैदी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
६५ वर्षांवरील १३ कैद्यांची कारागृहातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:25 AM