सिन्नर : वडांगळीसह १३ गाव पाणी पुरवठा योजनेचा जलसाठा हा मोठया प्रमाणावर असूनही खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे फीडरसाठी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी सादर केलेल्या ३५ लाख रूपयांच्या निधीस जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे योजनेतील गावांना एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडीतपणे पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनी सांगितले.सदर योजनेस एक्सप्रेस फिडरद्वारे वीज पुरवठा केल्यास सर्व गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येईल, त्यासाठी लागणाºया निधीची तरतूद जिल्हा नियोजनमधून करावी, अशी मागणी दि. ९ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती.वडांगळी सह १३ गाव पाणी पुरवठा योजनेला कडवा कालव्यातून थेट पाणी पुरवठा होतो. कडवाद्वारे हे योजनेच्या वडांगळी येथील २५ एकराच्या तलावात सोडले जाते. एवढया मोठया प्रमाणावरील जलसाठा असताना देखील वीजेच्या सततच्या निर्माण होणाºया अडथळयांमुळे कमी काळ वीज पुरवठा होतो. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत या गावांना सुरळीत पाणी पुरवठा करणे अवघड होऊन बसले आहे. ही बाब ओळखून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना सदर कोकाटे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या ३५ लाख रूपायांच्या एक्सप्रेस फिडरच्या प्रस्तावाला निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजनेला मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 5:45 PM