-----------------------
‘माझी आरोग्य वारी’ची प्रत आरोग्य अधिकाऱ्यांना भेट
सिन्नर : पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीप्रमाणेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या गायत्री नाईकवाडे लिखित ‘माझी आरोग्य वारी’ या कवितेची प्रत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव व वावीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशिनकर यांना भेट देण्यात आली. यावेळी तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, आशा समन्वयक किरण सोनवणे, अशोक सूर्यवंशी, प्रकाश जाधव, धनंजय पानसरे, सरला दिवे, सारिका गुजराथी, सारिका घेगडमल, आशा शेळके आदी उपस्थित होते.
-------------------
पांढुर्ली विद्यालयात हर्षद ढोकणे प्रथम
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली येथील जनता विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, निकाल शंभर टक्के लागला आहे. हर्षद ढोकणे हा विद्यार्थी ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विद्यालयात विशेष श्रेणीत ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ६६, तर द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यश पवार द्वितीय, पूजा वारुंगसे तृतीय, तर तेजस कर्मे चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
--------------------
सोडत पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक
सिन्नर : एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक शाळेने शैक्षणिक वर्ष २०२१ साठी कोरोनाकाळ असतानाही ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ या उपक्रमात शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेतली. पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची निवडही सोडत पद्धतीने घेऊन अभिनव उपक्रम राबवला. निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी काम पाहिले. दर्शन चौधरी शालेय पंतप्रधान, तर अश्विनी शिंदे उपपंतप्रधान यांची निवड करण्यात आली.
----------------
ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
सिन्नर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिन्नर शाखेतर्फे वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शिक्षक समितीतर्फे कोविडयोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य नेते नंदू आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा प्रतिनिधी वाल्मिक शिंदे, संदीप काकड, तालुकाध्यक्ष अशोक कासार, सरचिटणीस सुकदेव वाघ, मार्गदर्शक बाळासाहेब फड, साहेबराव बोऱ्हाडे, विठ्ठल सानप आदी उपस्थित होते.
----------------
रिंग प्लस अॅक्वामध्ये वृक्षारोपण
सिन्नर : मुसळगाव एमआयडीसी येथील रिंग प्लस अॅक्वा (रेमन्ड ग्रुप) च्या वतीने वनमहोत्सवानिमित्त ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले. निसर्गाशी एकरूप होऊन, निसर्गाच्या सान्निध्यात राहून पर्यावरणाचा समतोल राखणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. आणि तोच ध्यास मनी धरून रिंग प्लस अॅक्वाचे विभागप्रमुख कमलाकर टाक यांच्या संकल्पनेतून ही वृक्षलागवड करण्यात आली. रिंग प्लस अॅक्वाच्या मोकळ्या जागेत अनिल त्यागी, अमोल शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.