नाशिक : महापालिकेने पन्नास कोटी रुपयांच्या वरील उलाढालीतून एप्रिल ते जुलै २०१६ या चार महिन्यांच्या कालावधीत १३२ कोटी रुपये एलबीटी वसूल केला असून, दरमहा सरासरी ३२ कोटी रुपयांची वसुली होत असल्याची माहिती एलबीटी विभागाने दिली. दरम्यान, महापालिकेला याव्यतिरिक्त शासनाकडून एलबीटीपोटी दरमहा ३१ कोटी रुपये अनुदानासह मुद्रांक शुल्कापोटीही रक्कम अदा केली जात आहे.महापालिकेने पन्नास कोटी रुपयांच्या वरील उलाढालीतून एप्रिल महिन्यात ३८ कोटी २७ लाख रुपये, मे महिन्यात ३२ कोटी ८३ लाख, जून महिन्यात ३२ कोटी २४ लाख आणि जुलै महिन्यात २८ कोटी ८२ लाख रुपयांचा एलबीटी वसूल केला आहे. याशिवाय दर महिन्याला शासनाकडून ३१ कोटी ९४ लाख रुपये अनुदानही प्राप्त होत आहेत, तर मुद्रांक शुल्कापोटी दरमहा सुमारे ५ कोटी रुपये मिळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खजिन्यात सरासरी ६५ ते ६८ कोटी रुपये जमा होत आहेत. महापालिकेला शासनाने मद्य आणि मद्यार्क संबंधित पदार्थांवरील एलबीटी वसुलीलाही परवानगी दिली. असली तरी त्याचा महसूल शासनाच्याच खजिन्यात जमा होणार आहे. (प्रतिनिधी)
मनपाकडून १३२ कोटी रुपये एलबीटी वसूल
By admin | Published: August 02, 2016 2:26 AM