तालुकाभरात एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले होते. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबर मध्येच तळाशी गेली आहे. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०० टक्के भरले होते. तथापि त्यातून पूरपाणी व खरिप आवर्तन सोडल्यानंतर पावसाने दडी मारल्याने धरण पुन्हा भरले नाही. तसेच धरणातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. भोजापूर धरणातील पाणी साठ्यावर दोन पाणी योजना कार्यान्वित आहे. नाशिक व अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे धरणावर पाणी आरक्षण असते. यावर्षी सिन्नर तालुक्यासाठी ११९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असल्याचे समजते.नगर जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी जिल्हाधिकाºयांनी अजून आरक्षण कळविलेले नाही. त्याचीही त्यात भर पडेल. भोजापूर धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून आजमितीस धरणात केवळ २१८ दशलक्ष घनफूट (६० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी आरक्षणात सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि गावांसाठी नदीद्वारे ११ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. शिवाय दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, शिवाजीनगर, नांदूरशिंगोटे, खंबाळे, भोकणी, दातली, गोंदे या गावांतील जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याद्वारे १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित आहे. मनेगावसह २२ गावे नळपाणी पुरवठा योजना ६७, कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेसाठी २६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित आहे. तर संगमनेर तालुक्यातील ७ गावांसाठी १४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जिल्हाधिकाºयांनी पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे समजते. त्यामुळे सिंचनासाठी किमान ८० ते ९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे व परिसराचे संपूर्ण शेती व्यवसाय भोजापूर धरणावर अवलंबून आहे. गत पाच वर्षापासून परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वत्र पाणी टंचाई आहे. यामुळे शेतकरी वर्गाला खरीप हंगामात पिकेही घेता आली नव्हती.
१३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 5:45 PM