नाशिक : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित दलितवस्ती सुधार योजनेसाठी प्राप्त झालेल्या ३५ कोटींच्या निधीतून करावयाच्या कामांसाठी समाजकल्याण विभागाकडे १३३२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, सर्वसाधारण सभेत ठरलेल्या निकषानुसार ३१ डिसेंबरपर्यंत कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असे आदेश समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी दिले आहेत.सोमवारी (दि.२८) समाजकल्याण समितीची बैठक सभापती उषा बच्छाव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत गटस्तरावरून प्राप्त सन २०१५-१६करिता २० टक्केसेस व ३ टक्के अंपग निधीतून अंतर्गत योजनांच्या वैयक्तिक लाभाच्या प्राप्त लाभार्थी याद्यांना बैठकीत मंजुरी देण्यात आली. वृद्ध कलावंत मानधन योजनेतर्गंत एकूण १०३ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.निवड समितीच्या मागील अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. नवीन प्रस्ताव शिफारस करून शासनास सादर करण्याची प्रक्रिया बंद आहे. या समितीच्या अध्यक्षांची निवड पालकमंत्री करणार असल्याने त्यांच्याकडे लवकरच प्रस्ताव ठेवून लवकरच त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी यांनी दिली. माहे मार्च २०१६ अखेर अपंगांच्या योजनेवर १०० टक्के खर्च करण्यात यावा, असेही बच्छाव यांनी संंबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. चालू वर्षासाठी दलितवस्ती सुधार योजनेसाठी ३५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्याचे नियोजन होत नसल्याबाबत ओरड सुरू झाली आहे. या निधीतून करावयाच्या कामांसाठी १३३२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, सर्वसाधारण सभेत ठरल्यानुसार निधीच्या प्रमाणात कामांची निवड करून त्यांना येत्या ३१ डिसेंबरच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असे आदेश सभापती उषा बच्छाव यांनी दिले. बैठकीस सुभाष गांगुर्डे, निर्मल गिते, बंडू गांगुर्डे, साईनाथ मोरे, स्वाती ठाकरे, इंदूबाई गवळी, अर्जुन मेंगाळ, अनिता जाधव, संगीता काटे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दलितवस्तीच्या ३५ कोेटींसाठी १३३२ प्रस्ताव
By admin | Published: December 28, 2015 10:35 PM