मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा तालुक्यात विक्रम
जानोरी : दिंडोरी तालुक्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे काम प्रगतिपथावर सुरू असून, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकाच दिवशी १३,७८८ लसीकरण करून दिंडोरी तालुक्याने आदर्श निर्माण केला असून, त्यात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राने एका दिवशी १,९३९ लसीकरण करून तालुक्यात विक्रम केला असून, सर्व स्तरातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे व आरोग्य विभागीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय दिसत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागापुढे एक आव्हानच होते. सुरुवातील लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरवली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजल्याने लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
शुक्रवारी (दि. १७) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातून १३,७८८ लसीकरणाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यात मोहाडी आरोग्य केंद्र १९३९, कोचरगाव ९६२, निगडोळ ६३०, ननाशी- १०५९, पांडणे १७८६, तळेगाव दिंडोरी १८००, उमराळे- १४०८, वरखेडा १२८४, वारे ९९८, खेडगाव १५९६ तसेच ग्रामीण रुग्णालय दिंडोरी २००, ग्रामीण रुग्णालय वणी १५५ असे एकूण १३,७८८ लसीकरण करण्यात आले आहे
आतापर्यंत २,३६,७८२ पैकी पहिला डोस १,१६,३१० (४९ टक्के), दुसरा डोस ३४,६६९ (१५ टक्के), एकूण लोकसंख्येनुसार ६३.८ टक्के लसीकरण झाले असून १,५०,९७९ नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी, उपकेंद्र येथील सर्व आरोग्य सेवक-सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या, आदी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत.
कोट...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत असून, तालुक्यातील त्यांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून एक आदर्श निर्माण करू व आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून दिंडोरी तालुका कायमस्वरूपी कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी.
(२० दिंडेारी)
लसीकरणावेळी जानोरी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष मांडगे, सोबत संजय गायकवाड, संतोष पवार, माया पांडे, डॉ. सियॉन राहुल, आरोग्यसेविका मंदा शिंदे, आदी.