नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेली कोरोनाची सौम्य लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून, गुरूवारी (दि.६) एकाच दिवसात चौदा रूग्ण कोरोनाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत. दररोज सरासरी दहा रूग्णांची भर पडत असतांना गेल्या सहा दिवसांपासून शहरातील कोरोना लसीकरणही लसींच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांचा काळजाचा ठोका चुकू लागला आहे.
गेल्या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हवामानातील बदलामुळे अवकाळी पाऊस व गारव्यामुळे शहरात सर्दी, खोकल्याची साथ सुरू झाली. त्यातच काही रूग्णांना ताप व घशात खवखवही होऊ लागल्याच्या तक्रारी सर्वत्र पुढे येवू लागल्याने राज्य सरकारनेच संभाव्य कोरोनाचा धाेका टाळण्यासाठी आरोग्य विभागाने संशयीत रूग्णांची कोरोना तपासणी करण्याच्या सुचना दिल्याने कोरोनाचे रूग्ण सापडले होते. सुरूवातीला हे प्रमाण कमी असले तरी, त्यात दिवसागणिक वाढ होत गेली व दररोज सरासरी आठ ते दहा रूग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.
त्यातच देशपातळीवर चिंता वाढविणारा एच३एन२ च्या नवीन विषाणूंचा शहरात शिरकाव झाल्याचे आढळून आले व जवळपास दहा रूग्ण सापडले. हे रूग्ण उपचाराने बरे झाले असले तरी, त्याचा धोका कायम आहे. अशातच गुरूवारी (दि.६) एकाच दिवसात शहरात चौदा रूग्ण आढळून आले आहेत.