सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णाचा निवास असलेला पांढुर्ली-शिवडे रस्ता परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. या भागात सुरू असलेले दोन आठवड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या काळात नवीन रुग्ण आढळून न आल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.सर्वेक्षणाचे काम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस व महसूल यंत्रणेतील सेवकांना पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सरपंच वैशाली भालेराव, सावतामाळी नगरच्या सरपंच मनीषा मंडलिक, कोविड नोडल आॅफिसर डॉ. लहू पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया वेटकोळी, ग्रामविकास अधिकारी जालिंदर वाडगे यावेळी उपस्थित होते.सर्वेक्षण कामात प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली येथील सर्व कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पॉझिटिव्ह आढळून आलेला रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील काळातही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हात धुणे, स्वच्छता पाळणे व कमीत कमी घराबाहेर पडणे ही खबरदारी घेण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
पांढुर्ली येथील १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:30 PM