नाशिक : जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी बरसली असून अवघ्या १४ दिवसांत पावसाने सप्टेंबर महिन्याची सरासरीदेखील गाठली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील पर्जन्यमान सरासरी २ हजार ८८१ मि. मी. इतके असताना मागील १४ दिवसांत २ हजार ९६१ मि. मी. इतका पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी १०२ इतकी आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यातील धरणेदेखील तृप्त झाली आहेत.
यंदा राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला असताना नाशिक जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठ फिरविली होती. लांबलेला पाऊस आणि धरणांची खालावत जाणारी पातळी यामुळे जिल्ह्यावर पाण्याचे संकटही निर्माण झाले होते. पाण्याचे फेरनियोजन करण्याची वेळ आल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. मध्यंतरी जुलैच्या अखेरच्या चरणात काही ठिकाणी पाऊस झाल्याने काही प्रमाणात धरणात पाणी जमा झाले. त्यामुळे दिलासा मिळाला असताना पावसाने पुन्हा ओढ दिली.
ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याचा अनुभव असल्याने ऑगस्टमध्येही पावसाची अपेक्षा होती. मात्र, ऑगस्ट महिनाही कोरडा गेल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांनाच सप्टेंबरमध्ये वरूणराजाची जिल्ह्यावर कृपादृष्टी बरसली आणि मुसळधार झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे तुडुंब झाली. बारा धरणांमधून विसर्ग करण्याची वेळ आली. नदी, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली. जोरदार बरसलेल्या पावसामुळे पाण्याचा प्रश्नदेखील निकाली निघाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्याचे सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २ हजार ८८१ मि.मी. इतके असल्याने पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्याची सरासरी या हंगामातही कायम राहील, अशी दाट अपेक्षा होती. त्यानुसार सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली असली तरी त्यासाठी संपूर्ण महिना थांबण्याची गरज लागली आहे. मुसळधार पावसामुळे अवघ्या १४ दिवसांतच सप्टेंबर महिन्याची सरासरी राखली गेली. अजूनही महिना संपण्यास पंधरा दिवसांचा कालावधी असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ससरारी पावसाचे रेकॉड होण्याची पूर्ण शक्यता आहे.