सटाणा : तालुक्यातील केळझर धरणातून मंगळवारी आरम नदीपात्रात १४० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनामुळे सटाणा शहरासह नदीकाठच्या वीस गावांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.सटाणा शहरासह डांगसौंदाणे, दहिंदुले, चाफापाडा, निकवेल, कंधाणे, चौंधाणे, निरपूर, खामताने, मुंजवाड, मळगाव, मोरेनगर, आराई यांच्यासह वीस गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. ही टंचाई दूर करण्यासाठी तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. याबाबत तत्काळ दखल घेऊन मंगळवारी (दि. २३) केळझर धरणामधून १४० क्यूसेस पाणी आरम नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी सोडण्यात आलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचावे यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेत नदीकाठच्या खासगी विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण कंपनीला दिले आहेत. तशी अंमलबजावणीही कंपनीकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)
केळझर धरणातून १४० क्यूसेसने विसर्ग
By admin | Published: February 23, 2016 10:21 PM