नाशिक : शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी (दि.१०) अधिकच जोर धरला. बारा तासांमध्ये शहरात तब्बल १४० मिलिमीटर विक्रमी पाऊस झाला. ज्या क्षणाची नाशिककर आतुरतेने वाट बघत होते तो क्षण म्हणजे गोदावरी दुथडी भरून वाहण्याची. हा क्षण रविवारच्या सुटीत नाशिककरांनी डोळ्यांत साठवत भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्याने टिपला. मुसळधार पावसाने शहरातील नाले व उपनद्यांना पूर आल्याने गोदामाई दुथडी भरून दोन वर्षांनंतर प्रथमच वाहत होती.दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने नासर्डी नदीसह सर्वच नैसर्गिक नाल्यांना पूर आला. त्यामुळे गोदापात्रातही पाण्याची पातळी वाढली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास साडेचौदा हजार क्यूसेक इतके पाणी नदीपात्रातून वाहत होते. अहल्यादेवी होळकर पुलाजवळ असलेल्या मोजपट्टीवरील १८४८ मीटरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचल्याची नोंद पूरनियंत्रण विभागाने केली आहे. रविवारी पहाटेपासूनच पावसाचा शहर व परिसरात जोर कायम होता. दोन वर्षांनंतर प्रथमच गोदावरी ओसंडून वाहत असल्याचा क्षण डोळ्याने टिपता यावा, यासाठी भरपावसात रेनकोट, छत्र्यांचा आधार घेत नाशिककरांनी होळकर पूल, घारपुरे घाट, इंद्रप्रस्थ पूल, आसारामबापू पूल, आनंदवली पूल, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल, लक्ष्मीनारायण पुलावर गर्दी केली होती.
बारा तासांत १४० मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2016 11:42 PM