नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीच्या प्रमाणात सातत्याने घट होत असून जिल्हाभरात मंगळवारी (दि.१९) केवळ १६२ रुग्णांची वाढ नोंदल्या गेली. तर १४० रुग्ण पूर्ण पणे बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्हाभरातील विविध रुग्णालयांमध्ये मंगळवारी दाखल झालेल्या १६२ रुग्णांसह १,३२८ कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात दाखल झालेल्या १६२ रुग्णांमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील, १३०, ग्रामीण भागात २८, मालेगाव महानगरपालिक क्षेत्रात दोन व जिल्हाबाह्य दोन रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस आल्याने रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसून येत आहे. सध्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून, लवकरच ही लस सामान्य नागरिकांपर्यंतही पोहोचणार असल्याने लकरच कोरोना हद्दपार होण्याचे संकेत दिसून येत आहे.
जिल्ह्यात १४० रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:16 AM