इंदिरानगर : महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विभागात बुधवारी (दि.१) एकूण १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक वत्सला खैरे, शिवसेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांचा समावेश आहे. काही माजी नगरसेवकांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा बुधवारी सहावा दिवस होता. नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रमांक ३० मधून सुप्रिया खोडे व शकुंतला खोडे यांनी अर्ज दाखल करत खाते उघडले. मंगळवारपर्यंत या प्रभागातून एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. बहुचर्चित अशा प्रभाग १३ मधून कॉँग्रेसच्या नगरसेवक वत्सला खैरे, तर प्रभाग १५ मधून शिवसेनेचे नगरसेवक सचिन मराठे तसेच माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग १६ मधून माजी नगरसेवक उज्ज्वला हिरे, नीलेश सहाणे, आनंद मोजाड तसेच प्रभाग २३ मधून सलीम बी. पठाण, प्रभाग १४ मधून महेंद्र परदेशी, अंकुश राऊत, प्रभाग १३ मधून एमआयएमचे दीपक डोके, प्रभाग १५ मधून मोहित गुंजाळ, प्रभाग १६ मधून रेखा दाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विभागात बुधवारी एकूण १५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या सहा दिवसांत एकूण २४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. निवडणुकीच्या रिंगणात माजी नगरसेवक उज्ज्वला हिरे यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक सुनील खोडे यांच्या पत्नी सुप्रिया खोडे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. (वार्ताहर)
खैरे, मराठे यांच्यासह १५ उमेदवारांचे अर्ज
By admin | Published: February 02, 2017 1:11 AM