नाशिक : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काढण्यात आलेल्या रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशानुसार चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या जुन्या नोटा तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ पडून असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला सुमारे १२ ते १५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे वृत्त आहे. नोटा स्वीकारण्यासाठी दिलेल्या मुदतीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जिल्हाभरातील शाखांमध्ये कर्ज व ठेवींच्या रूपात चार दिवसांत तब्बल ३४१ कोटींच्या गंगाजळी जमा करण्यात आल्या. या जमा करण्यात आलेल्या गंगाजळीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने त्याची तपासणी करण्यासाठी मध्यंतरी एक पथकही जिल्हा बॅँकेच्या दरबारी जाऊन आले. जिल्हा बॅँकेच्या जुन्या मध्यवर्ती इमारतीत असलेल्या स्ट्रॉँगरूममध्ये हजार व पाचशेच्या तब्बल ३४१ कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीय तसेच शेड्युल बॅँकांना विहित मुदतीत नोटा बदलून दिल्या. मात्र जिल्हा बॅँकेच्या ३४१ कोटींच्या नोटा बदलून देण्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने या नोटा तशाच पडून असल्याचे समजते. ही सर्व ३४१ कोटींची रक्कम बहुतांश ठेवींच्या रूपात असल्याने जिल्हा बॅँकेला ठेवींच्या रूपात मिळू शकणारा या रक्कमेवरील सुमारे १२ ते १५ कोटींचे व्याज बुडाल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर याच ठेवींपोटी संबंधित ठेवीदारांना जिल्हा बॅँकेला आता या तीन ते चार महिन्यांचे व्याजाचा भुर्दंडही माथी बसणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज बंद पाडले असतानाच शेतकऱ्यांचाच असलेल्या कोट्यवधींच्या निधीबाबत आता विरोधीपक्ष काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे व जिल्हा बॅँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
नोटाबंदीमुळे जिल्हा बॅँकेला १५ कोटींचा फटका?
By admin | Published: March 25, 2017 1:09 AM