नाशिक : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सन २००९ नंतरची अनधिकृत आढळून आलेली ३१६ धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही अखेर सुरू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सदर अनधिकृत धार्मिक स्थळांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या कालावधीत अतिक्रमण न हटविल्यास कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कृष्ण यांनी स्पष्ट केले. अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून देऊनही महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी (दि. १८) प्रसिद्ध केले होते. सदर अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीला मुहूर्तही लाभत नसल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते. सदर वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बुधवारी (दि. १९) समितीची तातडीने बैठक बोलवून अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईचा आढावा घेतला.
अनधिकृत धार्मिक स्थळांना १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’
By admin | Published: October 20, 2016 2:34 AM